जि.प. विषय समित्यांवरही भाजपचा वरचष्मा

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीपाठोपाठ विषय समिती सभापतींच्या निवडीतही भाजपचा वरचष्मा कायम आहे. बहुमताचा आकडा यापूर्वीच जुळवल्यामुळे सभापती पदाचीही निवडणूक बिनविरोध पार पडली. अध्यक्षपदाच्या निवडीत साथ देणारे मित्रपक्ष राष्ट्रवादी आणि अपक्ष समर्थक सचिन गरड यांना सभापतीपदी बसविले आहे. तर दोन महिला सदस्यांना सभापती पदाची संधी देऊन सत्तेचा समतोल राखला आहे. मीनाक्षी पवार, डॉ. बालाजी सोनटक्के, सचिन गरड, अनिता मोटे यांची या पदावर वर्णी लागली आहे. यावेळेच्या सभेलाही शिवसेना आणि उबाठाचे सदस्य गैरहजर राहिले.

विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी गुरुवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. पीठासीन अधिकारी संतोष गोरड यांनी सकाळी १० ते १२ या वेळेत नामनिर्देशन पत्रे स्वीकारली. सकाळी ६ अर्ज वाटप करण्यात आले होते. मात्र त्यापैकी फक्त चार अर्ज दाखल झाले. यामध्ये भापजच्या मिनाक्षी पवार, अनिता मोटे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे बालाजी सोनटक्के आणि भाजप पुरस्कृत अपक्ष सदस्य सचिन गरड यांचा समावेश होता. 

त्यामुळे ही निवडणूकही बिनविरोध होणार हे निश्चित झाले होते. दुपारी २ वाजता सभेला सुरुवात झाली. मात्र, निर्धारित वेळेत कोणीही उमेदवारी मागे घेतली नाही. त्यामुळे सभापतींच्या निवडीवर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले. महिला व बालविकास सभापतीपदी मीनाक्षी पवार तर समाजकल्याण सभापतीपदी डॉ. बालाजी सोनटक्के यांची निवड झाली आहे. उर्वरित दोघांची सभापतीपदी निवड झाली असली तरी त्यांना अद्याप विषय समित्या देऊ केलेल्या नाहीत. 

येणार्‍या सर्वसाधारण सभेत अर्थ व बांधकाम, कृषी व पशुसंवर्धन, शिक्षण आणि आरोग्य, जलसंधारण या विषय समित्यांच्या सभापतींची निश्चिती केली जाणार आहे. सिंचन समिती अध्यक्षांकडे तर कृषी व पशुसंवर्धन समिती उपाध्यक्षांकडे ठेवण्याचा प्रघात आहे. अर्थ व बांधकाम सभापतीपदी सचिन गरड तर शिक्षण आणि आरोग्य सभापतीपदी अनिता मोटे यांची निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.